←

देव उठवणे

नववा दिवस

नववा दिवस (देव उठवणे)

नेहमीप्रमाणे देवाची पूजा करावी. नंतर आरती म्हणावी, आरती पेण्याची अधिक करावी. फुलोऱ्याच्या दिवशीचे नैवेद्याचे फाफडे देवासमोर ठेवावे. खंडेराव तिखटे असल्याने कोंबड्याचे नाक चौरंगाच्या कोपऱ्यामध्ये घासून त्याच्या तुऱ्यावरील थोडे पीस खंडेरावाला वाहावे. नंतर कोंबड्याचा बाहेर नेऊन बळी द्यावा. बळी देताना सांडलेले रक्त नैवेद्यात मिसळून नैवेद्य बनवावा. बामणदेवा (प्रधान) साठी वेगळा शाकाहारी नैवेद्य बनवावा. आता एक एक देव त्या त्या जागेवर हलवणे. (थोडे वर उचलणे)

पहिली माळ, खंडेराव, देवी, ब्राह्मणदेव, गडू, घटाचा नारळ, घट, घटाचे व गडूतील तीर्थ पळीने काढून घ्यावे. त्यानंतर टांगलेले फाफडे, तेलाचे भांडे, समई हलवावी. सर्व नारळ परातीमध्ये घेऊन कुटुंबातील सर्वांनी त्याला हात लावून वर उचलावे व खाली ठेवावे. असे करताना खंडेरावाचा हेलकोट व अंबाबाईचा उदो करावा. सर्व नारळ फोडून प्रसाद करावा.

नैवेद्य तयार झाल्यावर ब्राह्मणदेवाला तिखटाचा वास लागू नये म्हणून मध्ये वस्त्र ठेवावे. इतर सर्व देवांना कोंबड्याचा नैवेद्य दाखवावा. ब्राह्मणदेवाला शाकाहारी नैवेद्य दाखवावा. सर्वांनी नैवेद्य खावा. फाफड्याचा, नारळाचा प्रसाद व भंडारा सर्वांना द्यावा.