देव्हरा : आतील चौरंगावर देव डावीकडून उजवीकडे पुढीलप्रमाणे मांडावेत.
भटजींना बोलावून देवाला अभिषेक करावा. अभिषेकाच्या वेळी देव दुसऱ्या चौरंगावर अथवा पाटावर ठेवावे कारण मुख्य देव्हाऱ्याच्या चौरंगावर एकदा स्थापन केल्यावर ते हलवायचे नसतात. अभिषेक आणि नियमित पूजा झाल्यावर वर उल्लेखल्याप्रमाणे देवांची तयारी करावी. (स्थापना करावी)
देव स्थापन केल्यानंतर प्रथम गणपतीची (पानावरील सुपारी) गंध, अक्षता, हळदीकुंकू, वस्त्र, नाडा, वाहून पूजा करावी. नंतर इतर सर्व देवांची गंध, अक्षता, हळदीकुंकू, वस्त्र, नाडा वाहून पूजा करावी. फुले वाहावीत. मध्यभागी घटाचा तांब्या तांदूळावर स्थिर ठेवून त्यामध्ये तुऱ्याचा नारळ (सभोवती ५ पानांची जोडी) (डोके खाली) स्थिर उभा करावा. (हा तुऱ्यांचा नारळ म्हणजेच घटी असलेली, पिसे असलेली, शस्त्र धारण केलेली देवी होय) देवीला म्हणजेच तुऱ्याच्या नारळाला बांगड्या, मणी असलेली पोत घालावी. सर्व देवांप्रमाणे या देवीची पूजा करून तिला वेणी घालावी. मागे स्थिर ठेवलेल्या तुळजाभवानीलाही वेणी घालावी.
देवाच्या तुऱ्यावर खुरासणीच्या दोन माळा (एक आपल्या कुटुंबाच्या वतीने व दुसरी इतर सर्व कुळांतील हजर व गैरहजर असलेल्यांच्या वतीने) बांधाव्या. माळा अशा रितीने बांधाव्यात की कोणत्याही दिवशी अथवा शेवटच्या दिवशी कुठली माळ कितव्या दिवसाची हे कळले पाहिजे. मखराला नाड्याचे तुकडे करून ते चारही बाजूला बांधावेत.
डावीकडील कोपऱ्यामध्ये समई पायाशी लाल मातीने लिंपून लावावी. ही सतत तेवत (देव उठेपर्यंत) ठेवण्याची व्यवस्था करावी. त्याशेजारी अथवा उजवीकडे मोकळ्या जागेत तेलाचे भांडे (नऊ दिवस समईत घालायचे) मातीने लिंपून ठेवावे. चौरंगाच्या पुढे ५ नारळ ओवून ठेवावेत. आरतीच्या वेळी निरंजन, उदबत्ती लावावी. समईची अजून एक ज्योत लावावी. आरती झाल्यावर नैवेद्य दाखवावा. प्रसाद सर्वांना वाटावा.
त्या दिवशी संध्याकाळी व दुसऱ्या दिवसापासून नियमित देवांची (कोणतेही देव जागेवरुन न हलवता) सकाळ-संध्याकाळ गंध, हळद, अक्षता, कुंकू, वस्त्र, फुले वाहून पूजा करावी. उदबत्ती, निरांजन लावावी. समईची अधिक लावलेली वात आरतीनंतर विझवावी.